
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर-: देगलूर तालुक्यातील येरगी हे गाव महाराष्ट्र ,कर्नाटक, तेलंगणा सिमेवर असून हे गाव पुरातत्त्वीय व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथे पाच चालुक्यकालीन शिलालेख व आता नव्याने आढळून आलेला एक असे एकूण सहा शिलालेख आहेत. नविन शिलालेख आढळून आल्यामुळे मागील एक वर्षामध्ये या येरगी गावाला चार- पाच वेळेस विषयतज्ञांनी भेट देऊन ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली.
या गावामध्ये दोन पुरातन बारव आहेत त्यात मागील 25 ते 30 वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी गावातील कचरा टाकल्यामुळे तसेच परीसरात झाडेझुडपे वाढल्यामुळे ते पुर्ण बुजलेल्या अवस्थेत होत्या. येरगीचे सरपंच यांना या पुरातन वारस्याबाबत माहिती दिल्यामुळे, तिचे 12 मार्च 2023 रोजी ग्रामस्थां सोबत, नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, नांदेड इंटँक चे सुरेश जोधळे, पुरातत्त्व संशोधक डॉ. कामाजी डक, सरपंच संतोष पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेश तोटावाड यांनी पाहणी केली व या ठिकाणी साफसफाईच्या कामा संबंधाने नियोजन करण्यात आले. कुठल्याही पुरातत्व अनुषंगाने असलेल्या मुर्ती, दगडी कामे यांना न हलविता सदरील साफसफाई करण्याचे नियोजीत करण्यात आले. मागील दहा दिवसामध्ये या गावातील मारोती मंदिराच्या बाजूला असलेली बारव सरपंच संतोष पाटील यांनी स्वतः आर्थिक भार पेलत पुर्ण स्वच्छ करण्याच्या कामी पुढाकार घेतला. या बारव मधला जसा जसा कचरा व घाण उपसा सुरु झाला तसे तसे तळातील पाण्याच्या झऱ्यांनी मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. हे पाहूण ग्रामस्थांमधील जुनी -जाणकार जेष्ठ व्यक्तींनी, सन १९८० ला या बारवेतून आम्ही पाणी भरत होतो असे सांगण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम पाहता येरगी गावातील दुसरी बारव स्वच्छतेचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.
येरगी गावामध्ये चार मंदिरांचे अवशेष, शिल्प, दोन बारवा व 18 आड आहेत. आडांची स्थिती आजतागायत व्यवस्थित असून आज देखील लोक या आडातील पाण्याचा वापर करतात. चालुक्य काळात होट्टल येथे त्यांची कार्यशाळा व येरगी येथे तत्कालीन नागरीकांची वस्ती असावी असा कयास विषयतज्ञांनी मांडला. तत्कालीन ग्रामस्थांना व पुढील पिढींसाठी कायमस्वरुपी पाणी उपलब्धतेच्या अनुषंगाने, बांधण्यात आलेल्या आड, बारव, विहिरी हा अभ्यासाचा विषय बनला आहे. आधुनिक नागरिकीकरणास देखील मात करेल असे पाण्याचे योग्य नियोजन त्याकाळातील नगर बसवणाऱ्यांनी केले होते. त्याचाच परिपाक म्हणजे आज घडीस देखील या गावात पाण्याचा दुष्काळ , प्रादुर्भाव जाणवलेला नाही.
येरगी गावामध्ये असलेल्या दोन्ही बारवांची स्थिती आज मितीस वाईट आहे. त्यांचे संवर्धन झाल्यास निश्चीतच त्या ठिकाणी पाण्याचा मोठा स्त्रोत ग्रामस्थांना उपलब्ध होऊ शकतो. गावातील लोकांनी या बारवांचा उपयोग कचराकुंडी म्हणूनच केला होता. त्यांना या चालुक्यकालीन बारवांचे महत्त्व नसावे. या संदर्भात गावचे सरपंच संतोष पाटील यांच्यासोबत बऱ्याच वेळेस गावातील या दोन्ही बारवा स्वच्छ करणे कशा आवश्यक आहे यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी गावचा हा ठेवा अनमोल आहे. त्यामुळे तो चांगला राहिला पाहिजे. होट्टलला येणारे पर्यटन येरगीला देखील आले पाहिजे पर्यायाने पर्यटनाला देखील चालना मिळेल. गावातील पाणी व्यवस्थापनाचे धडे आधुनिक नगर रचने करीता कसे मार्गदर्शक ठरु शकतील याचा सातत्याने विचार केला. परंतू म्हणतात ना सोनारानेच कान टोचावेत. त्या उक्ती प्रमाणे प्रशासन व तांत्रिक ज्ञान असलेल्या समावेशक अशा टिमला घेवून ज्यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार मकरंद दिवाकर , पुरातत्त्व विषयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभ्यासक डॉ. कामाजी डक, कला शिक्षक गजानन सुरकुटवार, गावचे सरपंच संतोष पाटील व ग्रामसेवक राजेश तोटावार यांनी दिनांक १२ मार्च,२०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येरगी गावाची पाहणी केली. यावेळी सोबत गावकरी पण होते. यावेळी गावातील सरस्वतीची मूर्ती व सप्तमातृकापट व्यवस्थित पाण्यानी धुवून घेतला. यानंतर बारवांची पाहणी करण्यास सुरूवात केली. अवतीभोवती असलेली झाडे, गावकऱ्यांनी टाकलेला कचरा यामुळे व्यवस्थित पाहता देखील येत नव्हते. यावेळी गावातील मारोती मंदिरासमोर ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्याच ऐतिहासिक वारशाची माहिती दिली. ज्यास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
काल दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी पुन्हा नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, नांदेड इंटँक चे सुरेश जोंधळे, पुरातत्त्व संशोधक डॉ. कामाजी डक, जेष्ठ पत्रकार तथा शिवानंद स्वामी, सरपंच संतोष पाटील, ग्रामसेवक राजेश तोटावार यांनी येरगी येथे भेट देऊन या कामाची पाहणी केली. तसेच बारव व पुरातन अवशेष सभोवताचे झालेले अतिक्रमण काढण्या संदर्भात संबंधितांना सुचना दिल्या.
महाराष्ट्रात मागील दोन वर्षापासून बारव मोहीम जोरात सुरू असून रोहन काळे यांनी या मोहिमेला गती दिली आहे. त्यामुळे बारवांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे यासाठी बरेच लोक समोर आले आहेत. महाराष्ट्रभर ही मोहीम सध्या सुरू असून यात बरेच लोक सहभागी झाले आहेत. यात पुरातत्व विभाग नांदेड चे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे.
येरगीतील बारव व आड हा सांस्कृतिक वारसा अभ्यासण्यासाठी जिल्ह्यातील विषय तज्ञांसह पुनश्च येत्या महिण्याभरात गावास भेट देण्याचे नियोजन करण्यात आले.