दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
दुर्गापूर ग्रामपंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भोंगळ कारभार या मुद्द्याला धरून १८एप्रील पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती उपोषण कर्ते व समाजसेवक सुनिलदादा पाटील यांनी आज दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी ला दिली.
दुर्गापुर ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या गोड-मधुर संबंधातून स्थानिक जनतेला कधीही विश्वासात न घेता, ग्रामपंचायत मार्फत काढण्यात येणारी बांधकामांची किंवा इतर विकास कामांची माहीती कधीही कोणालाही मिळाली नसुन येथील बांधकाम व विकास कामांची कंत्राटे आपसातील व्यक्तींना परस्पर देण्यासाठी षढयंत्र सुरू असल्याची विश्वासनिय वृत्त हाती आले आहे.
याबाबत दुर्गापूर ग्रामपंचायत कार्यालयास दि.८ एप्रिल रोजी निवेदन देऊन संब़धीत विषयांवर विचार विमर्श करण्यासाठी नियमानुसार वेळ देण्यात आला. परंतु या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आल्याने आम्हाला नाईलाजास्तव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या न्याय मागण्या घेऊन आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असुन उपोषणाला आज औपचारिक प्रारंभ करण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या..
या उपोषणाला ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांनी काम बंद करुन जाहिररित्या पाठिंबा दिलेला आहे. यावेळी सध्याचे कामांचे सर्व टेंडर रद्द करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना त्यांचे स्थगित असलेले वेतन त्वरीत देण्यात यावे आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच,सचिव व सदस्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशा महत्त्वपूर्ण मागण्यांसह इतरही काही मागण्या असल्याचे उपोषणकर्ते समाजसेवक श्री.पाटील यांनी सांगितले आहे.