दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहर व देगलूर तालुक्यात सध्या सगळीकडे आयपीएल माफिया जोमात असून या अनाधिकृत खेळातून दर दिवशी लाखोंची उलाढाल होत आहे. परिणामी नवतरुण यामध्ये गुरफटल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर कृत्रिम संकट कोसळले आहे या बाबीची दखल घेऊन बेकायदेशीर सट्टेबहादराविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित होते मात्र अर्थपूर्ण व्यवहारातून पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील मरखेल हे अवैध आयपीएल सटटयाचे मुख्य केंद्र असून येथील एका सूत्रधाराने आपल्या फंटरमार्फत आजूबाजूच्या तालुक्यासह हाणेगाव, करडखेड, शहापूर, खानापूर यांसह अन्य ठिकाणी आपले जाळे पसरविले आहेत. या माध्यमातून प्रत्येक दिवशी लाखोंची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे आयपीएलची मॅच सुरू होण्या अगोदर १५ मिनिटे आधी या सट्टे बाजाराला सुरुवात होते. कोणत्या संघाचा कर्णधार टॉस जिंकणार येथून सट्टा लावायला सुरुवात होते. या टॉसचा दर हा ९०० रुपये आहे. एखाद्याने आजच्या सामन्यात हा कर्णधार आज टॉस जिंकणार असा १ हजार रुपयांचा सटटा लावला अन् त्याचा अंदाज बरोबर ठरला, तर त्याला स्वतःचे १ हजार आणि त्यावर नऊशे, असे एकूण १ हजार ९०० रुपये दिले जातात. मात्र, अंदाज खोटा ठरल्यास संबंधिताचे १ हजार रुपये बुडतात. याने त्यामध्ये कोणता संघ पावणे दोनशेपेक्षा जास्तधावा करणार कोणता खेळाडू अर्धशतक किंवा शतक करेल, या वर सट्टा लावला जात आहे. याच पद्धतीने खेळाच्या प्रत्येक घडामोडींवर सट्टा लावला जात आहे. यामुळे तरूण सुशिक्षित बेरोजगार या बेकायदेशीर जुगार ऑनलाईन खेळाकडे अधिकचे वळल्याने अमिषाला बळी पडून वेळ प्रसंगी शेकडा ५ व १० टक्के व्याजाने पैसे काढणे, सोने नाणे, दागदागिने विक्री करून या ऑनलाईन सट्टा बाजारात पैसे टाकत असल्याचे खात्रीलायक व्रत आहे. परिणामी अनेकांचे संसार उधवस्त होण्याच्या मार्गावर असताना पोलीस प्रशासन अनभिज्ञ का ? असा सवाल उपस्थित होत आहे. सट्टा घेणाऱ्याचा पोलिसांना शोध लागत नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. देगलूर तालुक्यातील बाजारात करोडो रुपयाची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, सट्टे बहादर गुंडांना ताब्यात घेऊन हा ऑनलाईन सट्टा बाजार बंद करावा अशी मागणी होत आहे.