दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी –अनिल पाटणकर
पुणे : भारताची विविधतेत एकता असलेला देश अशी असलेली ओळख अजून ठळक व्हावी आणि भारतात राहणाऱ्या विविध जाती धर्मांच्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल सद्भावना,प्रेमभाव निर्माण व्हावा या उद्देशाने तसेच रमजान ईदचे औचित्य साधून पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यान शेजारी येथे विविध संस्था संघटनांकडून शनिवारी (दि.२९) “पैगाम-ए-अमन” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेम, शांती आणि सद्भावनेचा संदेश देणारी गाणी, कविता आणि शेर-ओ-शायरी अशा विविध कलाविष्काराच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामध्ये ईद मुबारकचा सेल्फी पॉईंट, आकर्षक रांगोळी,विद्युत रोषणाई आणि पताकांनी हा कार्यक्रम अधिकच उठावदार झाला. प्यार बाटते चलो……, चल चलिए……. हि गाणी, मैं खीर,तू शीरकुर्मा हा हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा एक्य सांगणाऱ्या रॅपचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता.
यावेळी बोलताना मा. न्यायमूर्ती बी .जी. कोळसे पाटील यांनी सांगितले कि,“आपल्या देशात कायमच मिली-जुली संस्कृती राहिली आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण या द्वेषाने भरलेल्या समाजात प्रेमाचे दुकान उघडण्याची जबाबदारी आपली आहे” तर लोकायतच्या समन्वयिका अलका जोशी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाल्या कि, आपल्या संत परंपरेने समता, बंधुता, मानवता यांसारख्या मूल्यांची जपणूक करत तिचा प्रचार-प्रसार केला. हीच मूल्यं आपल्या देशाच्या संविधानातही आली आहेत. म्हणूनच सर्व मिळून सर्व सण साजरे करणं ही आपली परंपरा राहिली आहे.
पुण्यातील लोकायत, मराठा सेवा संघ, भिम आर्मी (बहुजन एकता मिशन), मूलनिवासी मुस्लिम मंच, युनिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ्ड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, नितीन जाधव, मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर, युनिक फाऊंडेशनचे विशाल जाफरी यांनीही उपस्थित राहून आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहर अध्यक्षा मृणालिनी वाणी, भिम आर्मी(बहुजन एकता मिशन)चे दत्ता पोळ, मूलनिवासी मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, समाजकल्याण विभागाचे सुशीलकुमार शिंदे, अधिकारी म्हस्के, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, अंगणवाडी कर्मचारी सभा, पथारी पंचायत, रिक्षा पंचायतचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. पुणे पोलीस परिमंडळ १, डेक्कन पोलीस स्टेशन यांचे कार्यक्रमात विशेष सहाय्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शिरकुर्म्याचा आस्वाद घेतला. मराठा सेवा संघाचे सचिन आडेकर यांनी आभारप्रदर्शन मांडले.