दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र दिनी जव्हारमध्ये करण्यात आला.या उपक्रमामुळे नागरिकांना आरोग्य सुविधेबाबत दिलासा मिळणार आहे.राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ३१७ “आपला दवाखाना” सुरू करण्यात आले असून त्यात जव्हार नगर परिषदेच्या मांगेलवाडा आरोग्यवर्धिनी केंद्रात हा आपला
दवाखाना सुरू करण्यात आला आहे.या दवाखान्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे केले.यादवाखान्यामुळे नागरिकांना सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत आपले रोजगाराचे काम करता येणे शक्य होणार आहे त्यामुळे रोजगार न उडता आरोग्य व्यवस्था देखील चांगली मिळणार आहे शिवाय शहरातील नागरिकांना गर्दीतून सुटकाही मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागरिकांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सेवा दिली जाणार आहे.या आपला दावाखला शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन विनीत मुकणे,सदस्य संत रोहिदास चर्मकार आयोग महाराष्ट्र राज्य यांनी देखील उपस्थिती नोंदवली.त्याच बरोबर जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजया लहारे,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे,सहा.जिल्हाधिकारी आयुषी सिंह,जव्हारच्या तहसीलदार आशा तामखडे,जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मानीनी कांबळे तसेच आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि आशा कार्यकर्ती व पत्रकार उपस्थित होते.
——————
जव्हार शहरातील आपला दवाखाना दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे.महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.याशिवाय आठवडा आणि पंधरावडा वार ठरवून स्त्रीरोग तज्ज्ञ,स्किन तसेच नेत्रतपासणी आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार केले जाणार आहे.हा दवाखाना शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांसाठी सोयीचे आहे.
डॉ.किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी,जव्हार