दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील विझोरा येथे एका बापाने मुलगा दारू पिऊन सतत त्रास द्यायचा म्हणून त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी घडली असून पारध पोलीस ठाण्यात गुरूवारी सदरील बापाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मयत मुलाची आई संगीता गजानन आढाव (रा. विझोरा, ता. भोकरदन) यांनी पारध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा आदित्य गजानन आढाव (21) याला दारू पिण्याचे व्यसन होते आणि दारू प्यायल्यावर तो सतत आई-वडिलांना त्रास द्यायचा. दरम्यान बुधवारी रात्री 9.30 वाजता आदित्य हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने आई संगीता आणि वडील गजानन येडुबा आढाव या दोघांशी बराच वेळ हुज्जत घातली आणि त्यांना रात्रीचे घराबाहेरच थांबा म्हणून धमकी दिली. याचा राग येऊन गजानन आढाव यांनी त्याच रात्री आदित्य याचा गळा आवळून खून केला आणि आदित्यने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला.
अगोदर या प्रकरणात पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी मयत मुलाची आई संगीता आढाव यांनी उपरोक्त आशयाची फिर्याद दिल्याने मयताचे वडील आरोपी गजानन येडूबा आढाव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पारध ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, सुरेश पडोळ, शिवाजी जाधव हे करत आहेत. भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पोलीसांना तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या.