दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.5 वाघोली येथील शासकीय/ गायरान/ खाणपड/ अशा एकूण ४७ हेक्टर ७३ आर (जवळपास १२० एकर) जमिनींच्या सातबाऱ्यावर पुणे महानगरपालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ अशी नोंद पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आली असून या जमिनींचे संरक्षण करणे, सार्वजनिक प्रयोजनासाठी वापर करणे व अतिक्रमण काढण्याकरिता नियोजन प्रधिकारी म्हणून पुणे महापालिका काम पाहणार आहे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढणे व संरक्षण करणे तसेच या जमिनीवर सार्वजनिक सोयीसुविधा आरक्षणे प्रस्तावित करण्यासाठी महापालिकेला सोप्पे झाले आहे.
वाघोली सह २३ गावांचा महापालिकेत समावेश झाला असला तरी येथील शासकीय/ गायरान जमिनीची मालकी जिल्हाधिकारी यांच्या नावावर असल्याने याठिकाणी होणारे अतिक्रमण काढणे तसेच त्याचे संरक्षण करताना महापालिकेला अडचणी येत होत्या. या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याबाबतच्या वारंवार तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे शासकीय जमिनीच्या देखभालीसाठी पुणे महानगरपालिका यांच्याकडे असे इतर अधिकारात शेरे दाखल करून देखभालीसाठी दिल्यास ४७ हेक्टर ७३ आर जमिनीवरील होणाऱ्या अतिक्रमणास निर्बंध आणता येईल अशी जिल्हाधिकारी कार्यालयाची धारणा झाली असल्याने जिल्हाधिकारी यांनी आदेश काढल्याने वाघोलीतील शासकीय/ गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर पुणे महानगरपालिकेकडे देखभाल व अतिक्रमण संरक्षणार्थ नोंद झाली आहे.
पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या वाघोलीत शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात असली तरी या जागांवर निवासी तसेच व्यावसायिक अतिक्रमणे देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. या जागांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांकडून मागणी केली गेली मात्र ठोस अशी कारवाई झाली नाही तर अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. महापालिकेकडे या जागा संरक्षणासाठी आल्या असल्याने महापालिकेकडे असणारी मोठी यंत्रणा अतिक्रमणांची तक्रार आल्यास यावर काय कारवाई करते याकडे वाघोलीतील नागरिकांचे लक्ष असणार आहे.