दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम –
वाशिम : अचाट धैर्य, अजोड पराक्रम, व असामान्य शौर्याच्या बळावर अनेक मोहिमा गाजवून, एकाही मोहिमेत पराजित न होणारे धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम येथे आशिष रतन इंगोले व मित्र परिवाराच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वयोगटाच्या युवकांसाठी भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने सुनील पाटील खडसे यांनी दिली आहे.
आजच्या धावपळीच्या व अत्याधुनिक युगात मनुष्याचे शारीरिक, मानसिक व व्यायामाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याकारणाने, समाजाचा विशेषतः युवकांचा व्यायामाकडे बघण्याचा कल बदलावा या स्तुत्य हेतूने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे अजेय योद्धा, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात येणार आहे. सूर्यनमस्कार करणे हे शरीरासाठी आरोग्यदायी असे सूत्र असून, सूर्यनमस्कारामुळे सर्वांच्या दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक बदल होतात. तसेच आपले तन, मन दिवसभर चैतन्यमय राहते. त्यामुळे सूर्यनमस्कार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. असे प्रतिपादन स्पर्धेचे आयोजक आशिष इंगोले यांनी केले आहे.
वाशिम येथील शिवाजी चौक येथे होणाऱ्या सूर्यनमस्कार स्पर्धेत विजयी स्पर्धकांसाठी ११ हजार १११ रुपये प्रथम पारितोषिक, ६ हजार ६६६ द्वितीय पारितोषिक व ३हजार ३३३ रुपयाचे तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे. सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेऊ शकतील. तसेच ५० कि.मी. पेक्षा जास्त दूरवरून येणाऱ्या स्पर्धकासाठी अगोदरच्या दिवशी राहण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धेची निशुल्क नोंदणी व अधिक माहितीसाठी सुनील पाटील खडसे, योगेश लोनसुने, व जॉन्टी इंगोले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.