
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : वर्धा ते नांदेड रेल्वे मार्ग पूर्णत्वाकडे असून आगामी डिसेंबरच्या अखेरीस ही रेल्वे वाहतूक सुरु होईल, असे संकेत मिळत आहेत. विद्यमान काळात लागणारा सुमारे दहा ते साडे दहा तासांचा प्रवास हा मार्ग सुरु होताच तो केवळ आणि केवळ चार तासांत पूर्ण करता येणार आहे. या रेल्वे सेवेमुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडण्याचा एक ऐतिहासिक प्रयोग झाला आहे हे विशेषत्वानं सांगावं लागेल.
वर्धा ते यवतमाळ या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नव्वद टक्के काम यापूर्वी पूर्ण झालं आहे. यवतमाळ ते नांदेड या दरम्यानचे एकलमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे आणि ५ उड्डाण पूलांचे बांकाम प्रगतीपथावर आहे. वर्धा ते कळंब या ४० कि.मी.अंतर रेल्वे मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. देवळी रेल्वे स्थानकाच्या सुसज्ज वास्तूचे काम पूर्ण झाले असून फलाटं व इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळेच येत्या जानेवारी पर्यंत वर्धा-देवळी-कळंब दरम्यान रेल्वेगाडी धावली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या मार्गाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे नियोजन खासदार तडस यांनी बोलून दाखवले. या मार्गाचा वर्धा ते यवतमाळ हा ७८ कि.मी.चा पहिला टप्पा व यवतमाळ ते नांदेड हा दुसरा टप्पा २०६ कि.मी.चा असून एकूण २८४ कि.मी.चा हा मार्ग रुपये साडेतीन हजार कोटींची लागत लावून पूर्ण केला जात असल्याचे समजते आहे.
या प्रकल्पाच्या कामावर पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात आहे. २०२३ च्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये वर्धा ते कळंब दरम्यान रेल्वे प्रवास चाचणी घेण्याची संभावना व्यक्त होत आहे. अशा नियोजनाची सूचना खा.तडस यांनी दिली आहे. वर्धा व यवतमाळ हे जिल्हे रेल्वेने जोडले जाणार असल्याने मालवाहतूक व साठवण यांना अधिक महत्त्व वाढले जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादित धान्य आणि औद्योगिक इंडस्ट्री मालाच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. किंबहुना तेच महत्व ध्यानी घेऊन भव्य असा निर्माण मालधक्का वेळेत पूर्ण केला जावा, यासाठी आवश्यक त्या तरतूदींचा नियोजनात समावेश केला जावा अशा सूचनाही करण्यात आल्याचे समजते. वर्धा येथून नांदेडला जाण्यासाठी उपलब्ध रेल्वे सेवेने सध्या साडे दहा तास लागले जातात परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यावर केवळ चार तासांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा हा ऐतिहासिक पर्याय ठरला गेला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
देवळी रेल्वे स्थानकाच्या भव्य प्रवेश द्वारावर परिसरातील स्वातंत्र्य सेनानींच्या आठवणी साकारण्याचा प्रयत्न रेल्वे खात्यातर्फे केला जाणार आहे. सन २००९ मध्ये मंजूर वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात २०१६ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. केंद आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने आवश्यक तो निधी तातडीने मंजूर व उपलब्ध करुन दिला गेला.
दरम्यान, येणाऱ्या नजिकच्या काळात नांदेड-नायगांव-बीदर आणि नांदेड-सोनखेड-लोहा-अहमदपूर ते लातूर या दोन्ही नवीन रेल्वे मार्गांच्या कामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल यात शंकाच नाही. ज्यामुळे रेल्वे सेवेपासून आतापर्यंत उपेक्षित हे दोन्ही मार्ग येत्या काळात विकसित बनले जातील. या दोन्ही भागातील क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात औद्योगिक चालना मिळली जाईल. जेणेकरून उपेक्षित, वंचित, कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित, पदवीधर व पदव्युत्तर या सर्वांच्या हाताला काम मिळू शकेल. जमिनीचे भाव गगनाला भिडले जातील. या दोन्ही विभागांची विकसित क्रांती उदयास येईल. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रयत्न सत्कारणी लागले जाऊन या विकासाच्या पाठीमागे त्यांचे नाव सुध्दा अजरामर राहिले जाईल, हे वेगळे सांगायला नको.