दैनिक चालू वार्ता पुणे प्रतिनिधी –अनिल पाटणकर
पुणे : पुणे जिल्ह्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या वेल्हे तालुक्यातील विवीध शाळेतील व शाळाबाह्य मुलांसाठी उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून येथील शिवार फाउंडेशनच्या वतीने नुकतेच उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात पाच शाळेतील विद्यार्थ्यासह अनेक शाळाबाह्य मुलेही सहभागी झाली होती.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या सुट्ट्यांचा मुलांना सदुपयोग व्हावा व त्यांचा बौद्धिक क्षमतेत वाढ होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबतच इतर कला कौशल्याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी शिवार फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाळ इंगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये मुलांना आनंददायी व कृतियुक्त गीते, संवाद कौशल्य व कल्पकता , मनोरंजन भाषा व गणित विकास, शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर याची प्रात्यक्षिते दाखवत मुलांना हसत खेळत शिक्षण कशा पद्धतीने घेता येऊ शकते याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले याशिवाय शैक्षणिक प्रवाहापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष कार्य हाती घेण्यात आले.