
दैनिक चालु वार्ता उपसंपादक धाराशिव-नवनाथ यादव
८७ हजार ८२ रुपयांचा प्रथमदर्शनी अपहार झाला असल्याचे विस्तार अधिकारी पी.एस. इंगळे यांनी अहवालात स्पष्ट झाले असून ग्रामस्थांचे कारवाईकडे लक्ष वेधले आहे.
भूम:तालुक्यातील सावरगांव – दरेवाडी ग्रामपंचायतमध्ये अपहार झाल्याचे विस्तार अधिकारी पी.एस. इंगळे यांच्या चौकशीत उघड. तालुक्यातील सावरगांव – दरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करून ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी गावातील राजेंद्र बोराडे, सुंदर अंधारे व ज्ञानेश्वर मस्के यांनी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे दि.१३ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.आर.ढवळशंख यांनी तातडीने तक्रारीची दखल घेत विस्तार अधिकारी पी.एस. इंगळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर प्रकरणाची विस्तार अधिकारी इंगळे यांनी दि.१० मे रोजी केलेल्या चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या असून ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार दिसून आला आहे. तालुक्यातील सावरगांव -दरेवाडी ग्रामपंचायत चौकशी दरम्यान कार्यालयामध्ये बहुतांश अभिलेखे आढळून आली नाहीत. सदर प्रकरणात चौकशी दरम्यान विस्तार अधिकारी पी.एस. इंगळे यांच्या समोरच काही अभिलेखे ग्रामपंचायतच्या सेवकाने भूम येथून आणल्याचे आढळून आले. तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतसाठी जे साहित्य खरेदी केले आहे त्या साहित्याच्या पावत्यावर तारखा नमूद नाहीत. तसेच कॅश बुकही उपलब्ध नाहीत. पंधराव्या वित्त आयोगाच्या प्रशासकीय मान्यतेवर ग्रामसेवकाच्या स्वाक्षऱ्या तसेच तारखा नाहीत. तसेच साहित्याच्या दरपत्रकावर दुकानाच्या नावा व्यतिरिक्त कोणताही तपशील नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ६ लाख रुपयाची सदरील दरपत्रके बनावट असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच कॅशबुकचा ताळमेळ लागत नाही. ग्रामपंचायतच्या ग्रामसभा शासन निर्णयानुसार झालेल्या नाहीत. तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या ६ लाख रुपयाच्या निधीतून करण्यात आलेली खरेदी ही आर्थिक अनियमितता असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. ग्रामनिधीत जीएसटी व इतर शासकिय देण्याबाबत जमा करण्यात आलेला खर्च बेकायदेशीर आणि पावत्याविना असल्यामुळे ८७ हजार ८२ रुपयांचा प्रथमदर्शनी अपहार झाला असल्याचे विस्तार अधिकारी पी.एस. इंगळे यांनी अहवालात स्पष्ट उल्लेख केला आहे. तसेच ग्रामसभेच्या आयोजना बाबत पुरेसा प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली नसल्याचे नमूद केले आहे. या चौकशी मध्ये सावरगावचे सरपंच रावसाहेब भोसले यांच्यासह ग्रामसेवक जबाबदार असून पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणात ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे कोणा कोणावर कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.