दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) : दर्यापूर डेपोची अवस्था अत्यंत दुर्दैवी असून प्रवाश्याला सोडण्यात येणारी प्रत्येक एसटी बस एसटी महामंडळाने तपासूनच पाठवायला हवी,परंतु दर्यापूर बस डेपोची दुर्दशा आणि प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एसटी बस व त्यासंबंधी समस्या दिवसेंदिवस वाढत असून महामंडळाचा कारभार भोंगळ झाला आहे.
दर्यापूर-कोकर्डा मार्गे अंजनगाव सुर्जी धावणारी एमएच २० डी ९३७१ ही बस टाकरखेडा मोरे गावाजवळ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली बस सेवा कोलमडलेली पाहायला मिळाली.त्यातल्या त्यात सदर मार्गाची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांना सुद्धा भंगार बसेस समवेत प्रवाशांच्या प्रश्नांच्या उत्तरांना तोंड द्यावे लागत आहे.महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्या मार्गावर गाडी चालवत शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारा चालक जीव मुठीत घेऊन जात आहे.बहुतांश नादुरुस्त असलेल्या एसटी बस रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहे.कधी स्टेअरींग जाम,तर कधी क्लच प्लेटमध्ये अडचण,तर कधी तांत्रिक बिघाडीच्या घटना समोर येत आहेत.यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.बस नादुरूस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टीफिकेट देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.