दैनिक चालु वार्ता चंद्रपूर उपसंपादक – दीपक कटकोजवार
महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने सन २०२३-२४ या वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल उपरोक्त पुरस्कार देऊन ग्रामीण क्षेत्रातील कार्यरत महिलांना सन्मानीत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येत असलेल्या घाटंजी तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथील धडाडीच्या महिला नेत्या सौ.मंगला अनंतराव कटकोजवार यांची निवड उपरोक्त पुरस्कारासाठी खापरी ग्रामपंचायत तर्फे करण्यात येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त दि.३१ मे रोजी ग्रा.पं.कार्यालयात निमंत्रित करुन सौ.मंगलाताईंना हा महत्त्वाचा पुरस्कार सरपंच यांचे हस्ते ग्रामसेवक व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह,शाल श्रीफळ व रोख रक्कम ५००/-रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे समजते. पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसर व तालुक्यातील महिलांकडून सौ.मंगलाताईवर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. सन्मान पत्रावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, महिला बालकल्याण विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा या मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.