दैनिक चालु वार्ता परभणी शहर प्रतिनिधि- शेख इसाक
दिनांक १५.०६.२०२३ रोजी पासून शाळांना सुरूवात झालेली आहे. परभणी महानगरपालिकेतर्फे प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांमध्ये येणा-या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यामंध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेच्या प्रांगणात आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या, आलेल्या विद्यार्थ्यांचे फुले व फुगे देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्याथ्र्यांना गणवेश, पुस्तके व खाऊ वाटप करण्यात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शाळा सुरू होण्यापुर्वी महापालिकेच्यावतीने शाळांची रंगरंगोटी, स्वच्छता गृह दुरूस्ती, शाळा परिसर स्वच्छता, शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने प्रत्येक शाळेसाठी एक याप्रमाणे सहा अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. महापालिकेच्या शाळेत विद्यार्थीसंख्येत वाढ व्हावी या उद्देशाने शाळेच्या परिसरात घरोघरी जाऊन, पालकांची भेट घेऊन, सर्वेक्षण करून विद्यार्थ्यांना विनामुल्यप्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या शिवाय शासनाच्या सर्व ध्येयधोरणांची व योजनांची अंमलबजावणी करून विद्यार्थांना लाभ देण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या शहरामध्ये एकुण सहा शाळा असून उर्दु शाळा चार तर दोन मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. शाळेमध्ये पायाभूत सुविधा देण्याबरोबरच गुणवत्ता वाढीकडे या शालेय वर्षात भर देण्यात येणार आहे.
यावेळी प्रशासन अधिकारी शिक्षण धोंडीबा रणमाळ, सहायक आयुक्त मंजुर अहसन, शिवाजी सरनाईक, आवेज हाश्मी, जुबेर हाश्मी, अल्केश देशमुख, मालमत्ता व्यवस्थापक नसिरोद्दीन काजी, शाळेंचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.