दैनिक चालु वार्ता परभणी उपसंपादक -दत्तात्रय कराळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मंगळवार दि. ९ मे २०२३ रोजी सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या उत्कृष्ट पत्रकार वितरण सोहळ्यात पत्रकारांच्या कल्याणाच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा केल्या होत्या. मात्र या घोषणांना महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानाही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने आज मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड, भगवान परब, मनोज मोघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेवून नाराजी व्यक्त केली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधीची रक्कम पात्र पत्रकारास मासिक ११ हजार रुपयांवरून २० हजार रुपये पर्यंत वाढ करणे.तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील पत्रकारांसाठीची ६० वर्षांची वयोमर्यादेची अट शिथिल करून ती ५८ वर्षे करणे, पत्रकारितेचा कालावधी ३० वर्षे ऐवजी २५ वर्षे करणे,राज्य तसेच विभागीयस्तरीय अधिस्वीकृती समित्या गठीत करणे यांचे शासन निर्णय जारी झाले नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या यावेळी निदर्शनास आणून दिले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिका-यांना याबाबत जाब विचारला आणि ज्या घोषणा केल्या आहेत त्यावर शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.