एकाच दिवसात तीन जणांवर हल्ला केल्याची घटना…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : एकाच दिवसात एकाच परिसरातील तीन व्यक्तींवर दि.२ ऑगस्ट २०२३ रोजी पिसाळलेल्या माकडाने दुपारी ४:३० ते ५ च्या दरम्यान हल्ला केल्याने अंजनगाव सुर्जी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एक सेवानिवृत्त कोतवाल तर दुसरे खाजगी कॉन्व्हेंट शाळेवर महिला शिक्षिका असून तिसरी युवती विद्यार्थिनी आहे.या घटनेने शहरातील नागरिक हादरलेले आहेत.
सदर माहिती अशी की,खाजगी शाळेवर कार्यरत महिला शिक्षिका सौ.सोनाली शशिर माहुलकर (वय ३६ वर्षे रा.भोईपुरा) ह्या शाळेतून घरी परततांना त्यांच्या घरानजिकच पिसाळलेल्या माकडाने हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.सदर महिला गंभीर जखमी असून औषधोपचार सुरू असल्याचे डॉ.अमर सारडा यांनी सांगितले.
तर दुसरीकडे तलाठी कार्यालयातील कर्मचारी गणेशराव नारायणराव धुळे (वय ६२ वर्षे रा.ब्राम्हणपुरा) हे व्यक्ती त्यांच्या घराच्या छतावर गेले असता पिसाळलेल्या माकडाने हल्ला केला आणि तिसरी युवती मोनिका रमेश बोडखे (वय २७ वर्षे रा.बारीपुरा) ही घराच्या छतावर गेली असता तिच्यावर माकडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता ती धडपळत पायऱ्यांवरून पडली.तिच्या हाता-पायाला मुका मार लागल्याचे तिचे वडील रमेश पांडुरंग बोडखे यांनी सांगितले.जखमी पुरुष व्यक्ती व युवतीवर औषधोपचार सुरू असल्याचे डॉ.विलास कविटकर यांनी सांगितले.
दोन्ही घटना अंजनगाव सुर्जी शहरातील देवनाथ वॉर्ड परिसरातील असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर तिन्हीही व्यक्तींवर एकाच माकडाने हल्ला केल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.या गंभीर बाबीकडे दुर्लक्षित न करता वनविभागाने गांभीर्याने दखल घ्यावी व जखमी व्यक्तींना शासनाने मदत करावी असे घडलेल्या घटनेच्या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.