दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे.
जालना, मंठा.वडील आणि भावाच्या नावावर असलेले घर नावावर करण्यासाठी अंभोरा शेळके (ता. मंठा) ग्रामपंचायतचा ग्रामसेवक महेबुब अमीन मसुलदार याने दोन हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाधीश वर्ग क्र. ४ के. एम. जैस्वाल यांनी याप्रकरणात त्याला दोषी ठरवून पाच वर्ष कैदेची शिक्षा तसेच १० हजारांचा दंड ठोठावला.
मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके गावातील वडील व भावाच्या नावावरील मिळकत ग्रामपंचायतच्या वारसा हक्काचा व वाटणीचा फेर करण्यासाठी तक्रारदाराने २ मे २०१६ रोजी ग्रामसेवक महेबुब अमीन मसुलदार याला विनंती केली होती. या कामासाठी ग्रामसेवकाने दोन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने त्याला पाचशे रुपये लगेचचदिले होते. ग्रामसेवकाने पंधराशे रुपये घेऊन ये व कागदपत्रे घेऊन जा म्हणत परत पाठवले होते. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तत्कालीन पोलिस उपाधीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून सदर ग्रामसेवकाला पंधराशे रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाला. याप्रकरणात तीन साक्षीदार तपासण्यात आले. ग्रामसेवक महेबुब अमीन मसुलेदार याने लाच घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाधीश वर्ग क्र. ४ के. एम. जैस्वाल यांनी त्याला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारी अभियोक्ता ॲड. भारत के. खांडेकर यांनी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी अधिकारी सुजीत बडे यांनी सहकार्य केले.