वाळू माफियांचे येणार पुन्हा ‘अच्छे दिन’….
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
देगलूर:मोठा गाजावाजा करीत तालुक्यातील शेवाळा येथे एकमेव शासकीय वाळू डेपोची उभारणी झाली. स्वस्तात वाळू मिळणार या आशेने अनेकांनी आपल्या घराचे बांधकामही थांबविले होते. नुकतेच ऑनलाइन वाळू बुकिंगची प्रक्रिया पूर्ण होऊन या शासकीय डेपोतून ग्राहकांना वाळू वितरणाला सुरुवातही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात येथील १ ब्रास शासकीय वाळू ही संपूर्ण खर्चासह ४ हजार रुपयांच्या पुढे जात असल्याने स्वस्तात वाळू मिळण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे.
शेवाळा येथील शासकीय वाळू डेपोचे कंत्राट आशिक अहेमद शेख (बेटमोगरा) या ठेकेदारास देण्यात आले. २२ मे रोजी या शासकीय वाळूडेपोचे उद्घाटनही करण्यात आले.
२९ जून रोजी महसूल विभागाकडून सेतू सुविधा केंद्रावर या शासकीय वाळूसाठी ऑनलाइन वाळू बुकिंगची प्रक्रिया राबविली. एका व्यक्तीस त्याच्या आधार कार्डद्वारे ऑनलाइन बुकिंग करून ६ हजार ७०० रुपयांमध्ये १० ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी करण्यात आली. अखेर १४ जुलैपासून ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली. मध्यंतरी पावसाच्या अडचणीमुळे बंद करण्यात आलेला डेपो ३१ जुलैपासून पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
५ ब्रास वाळू म्हणून १४ टन म्हणजेच अंदाजे ४ ब्रास वाळू दिली जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. त्यात भरीस भर देगलूर म्हणजे १ हजार रुपये जेसीबीने वाळू भरण्याचा खर्च ५०० रुपये वाळूच्या वजन काट्याचे व ५०० रुपये ऑनलाइन रॉयल्टीचे असे २ हजार रुपये संबंधित कंत्राटदाराकडून अतिरिक्त वसूल केले जात असल्याची ओरड होत आहे. त्यातच पाच ब्रास वाळू डेपोतून घेऊन जाण्यासाठी १३ ते १४ हजार रुपये वाहन भाड्यासाठी मोजावे लागत आहेत. त्यामुळे या ५ ब्रास वाळूसाठी ग्राहकांना अंदाजे १९ हजार रुपयांच्या जवळपास खर्च येत आहे. प्रत्यक्षात एक ब्रास वाळू ही ४ हजार रुपयांच्या पुढे जात असल्याने सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू मिळणार, हे दिवास्वप्नच ठरले आहे.