दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर):
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुका प्रशासनाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून काल 13 सप्टेंबर रोजी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या नवोपक्रमास शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शहरातील साधना हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी “स्री शक्तीचा जागर” व “मला भारत देश विकायचा आहे” या दोन विषयावर पथनाट्य सादर करून समाजात मार्मिक संदेश दिला.
या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक देव हाळदे यांनी मार्गदर्शन केले.
येथील ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “अवयव दान” व “प्रासंगिक वेळी प्राथमिक उपचार” याबद्दल पथनाट्यातून अभ्यासपूर्ण संदेश दिला. यासाठी प्राचार्य राजाराम पागेकर, मुख्याध्यापक वैदेही पागेकर श्रीमती उजमा निखत यांनी मार्गदर्शन केले.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “स्त्री भ्रूण हत्या” या विषयी पथनाट्य सादर करून एक अंगाला वेगळा संदेश दिला.
या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक विशाल पवार यांनी मार्गदर्शन केले.
येथील परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “व्यसनमुक्ती” या विषयावर पथनाट्य सादर करून व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी संदेश दिला. या विद्यार्थ्यांना शाळेतिक शिक्षक योगेश वझलवार यांनी मार्गदर्शन केले.
सदरील एकूण पाच पथनाट्यांचे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात व शहरातील लोहिया मैदान मध्ये प्रदर्शन करण्यात आले. यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार राजाभाऊ कदम, बी.डी.ओ. शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार बालाजी सुरनर, गटशिक्षणाधिकारी डि.के तोटरे यांनी पथनाट्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पथनाट्यातील सहभागी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय तर्फे नाश्त्याची सोय करण्यात आली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे,कॉन्स्टेबल नामदेव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मिठाई देऊन त्यांचे कौतुक केले.
पथनाट्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव समितीचे बालाजी सुगावकर, ऐनोद्दीन वारसी, शिवानंद स्वामी, शंकर कुद्रे, कपिल जाधव,मोतीलाल साबणे ,तलाठी डी.जी. रातोळीकर, शिपाई गंगाधर सोनतोडे आदींनी परिश्रम केले.