नवी दिल्ली : भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत उतरणार आहे. तसेच, भारताच्या उपकर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या याच्या खांद्यावर असेल. अशातच विश्वचषकापूर्वी मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
विश्वचषकातील भारताचा ‘ट्रम्प कार्ड’…
विश्वचषकात भारतीय संघाला 9 सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्ये भारताने शानदार प्रदर्शन केले, तर संघाला उपांत्य सामन्यात जाण्याची संधी मिळेल. अशात अझित आगरकर यांनी फिरकीपटू कुलदीप यादव ट्रम्प कार्ड ठरू शकतो असे म्हटले आहे.
काय म्हणाले आगरकर..?
माध्यमांशी बोलताना अजित आगरकर म्हणाले की, “मी आयपीएलमध्ये त्याच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. त्याच्याकडे खास कौशल्य आहे. प्रत्येक खेळाडूवर विश्वास दाखवण्याची गरज आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने असे केले आहे आणि परिणाम समोर आहेत. तो आमच्यासाठी एक ट्रम्प कार्ड आहे. अधिकतर संघ त्याला आव्हान समजत आहेत. आम्ही सर्वजण आगामी स्पर्धेसाठी खूपच उत्साहित आहोत.”
आशिया चषकात कुलदीपचे दमदार प्रदर्शन…
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने शानदार प्रदर्शन केले होते. त्याने स्पर्धेत 5 सामने खेळत 9 विकेट्स घेतल्या होत्या. खरं तर, कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स आणि श्रीलंकेविरुद्ध 4 विकेट्स नावावर केल्या होत्या. तसेच, आता कुलदीपने विश्वचषकातही चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघाला मोठा फायदा होऊ शकतो.