
शहानूर नदी पात्रात वैद्यकीय घनकचरा आढल्याची पुनरावृत्ती..
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे शहानूर नदी पात्रात वैद्यकीय जैविक घनकचरा व्यवस्थापनेसंबंधित वारंवार प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.असे करण्यामागचा दोषी डॉक्टर कोण? वारंवार असे कृत्य करून डॉक्टर पेशीला काळीमा फासणारा दोषी डॉक्टर कोण? शहानूर नदी प्रदूषित करून जिवंत नदीला मृत करण्यामागे हेतू काय? नदी साफ सफाई संदर्भात नगरपरिषद दोषींवर कारवाई होणार की परत कागद काळे करून प्रश्न गुलदस्त्यात ठेवणार? असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांना पडले आहेत.
अंजनगाव सुर्जी शहरातील वारंवार वैद्यकीय जैविक घनकचरा शहानूर नदी पात्रात टाकण्याची पुनरावृत्ती होत असून ही बाब अतिशय दुर्दैवी आणि डॉक्टर पेशीला काळीमा फासणारी असून या अगोदर सुद्धा वैद्यकीय जैविक कचरा नदीपात्रात आढळला होता.त्यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यांनी पाहणी केली होती आणि सदर प्रकरणी मुख्याधिकारी यांना माहिती दिली.त्यानंतर मुख्याधिकारी यांनी ग्लोबल इको सेव्ह सिस्टीम बायोमेडिकल कंपनीला कारवाहीचे पत्र दिले होते.परंतु अधिकारी कागदोपत्री कारवाई पत्र दाखवून अंग झटकल्याचे आणि दोषी डॉक्टर मोकाट फिरत असल्याने त्या घटनेची पुनरावृत्ती परत झाली.जर या अगोदर योग्य कारवाई झाली असती तर परत नदीपात्रात वैद्यकीय जैविक घनकचरा टाकण्याची पुनरावृत्ती झाली नसती.
याला प्रशासकीय व्यवस्था कारणीभूत आहे की काय? असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.जर नदीची ही गथा आहे;तर सर्वसामान्यांना प्रशासकीय वर्ग खरचं प्रामाणिकपणे न्याय देतील का? पुढील कारवाई करण्याला वरिष्ठ अधिकारी गप्प का आहेत?अधिकारी वर्ग सामान्यांच्या प्रती खरंच योग्यतेने पाहतात का? असे अनेक प्रश्नांनी नागरिकांना वेढलेले आहे.
बायोमेडिकल वेस्ट नियमानुसार हा सेंद्रिय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या रुग्णालयांवर दंड आणि शिक्षेची तरतूद आहे.कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना न केल्यास पाच वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.त्यानंतरही आवश्यक उपाययोजना न केल्यास प्रतिदिन ५ हजार रुपये दंड आकारण्याचीही तरतूद आहे.