
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
सातारा :संपूर्ण देशभर नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. आता अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच साताऱ्यात येऊन अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांची भेट घेतली होती. निवडणुकीनंतर राजकीय बदलल्याचे चित्र पाहायला मिळत असताना भाजपचे आमदार व याआधीही जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषविलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुन्हा आपल्यालाच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी पवारांकडे केलेली आहे.
सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देण्याची मागणी केलेली आहे.गुरुवारी अजित पवारांना भेटल्यानंतर शिवेंद्रराजे यांनी शुक्रवारी लगेचच थोरल्या पवारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली.
शिवेंद्रराजे शुक्रवारी सिल्वर ओकवर जाऊन खासदार पवारांना भेटले. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. शिवेंद्रसिंहराजे आपण बँक उत्तम चालवली. अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करताय असे गौरवोद्गार यावेळी काढले तर बँकेत कोणतेही राजकारण न आणता सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केला, असे शिवेंद्रसिंहराजेंनी पवारांना सांगितले. ‘मी पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे तर हे पद मला मिळावे,’ अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी पवारांकडे केली, तेव्हा रामराजे अजितदादा यांच्याशी आपण चर्चा केली आहे आहे का ? असेही पवार यांनी विचारले, मी या दोघांशीही बोललो आहे, असे उत्तर शिवेंद्रसिंहराजेंनी पवारांना दिले. माझ्या निवडीला अजितदादांचा हिरवा कंदील आहे, असे देखील शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले. त्यावर अजित आणि रामराजे यांच्याशी मी बोलून घेतो असे पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना स्पष्ट केले असल्याचे कळतं.