दै.चालू वार्ता
तुषार नाटकर, पैठण प्रतिनिधी-
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे असून शुक्रवारी (दि.2) रोजी प्रचाराचा शुभारंभ त्यांनी नाथमंदिरात नारळ फोडून केला. यावेळी वाघचौरे यांनी विरोधी पॅनलवर जोरदार टीका केली. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला असताना कारखाना ताब्यात घेण्यासाठी कुटील कारस्थान रचला जात असून कारखान्यात प्रचंड अनागोंदी कारभार सुरु आहे. त्यातच कारखान्याच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज काढण्यात आले. मात्र कामगारांचे थकीत वेतन देण्यात आले नाही. कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे अडीच महिने झाले तरी उसाचे पेमेंट झालेले नाही असा आरोपही वाघचौरे यांनी केला. यावेळी शेतकरी नेते कैलास तवार, विष्णु बोडखे, अॅड. बाबर, गोविंदराव शिंदे, शेखर देशमुख, अनिल हजारे, गुलाब लांडगे, संतोष एरंडे, विशाल वाघचौरे, योगेश सोलाटे, विनोद हुसे, शिवाजी घोडके आदींसह शेतकर्यांची प्रमुख उपस्थिती होती.