संपदा दयानंद पवार ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):शेटफळ हवेली येथे शिवजयंती निमित्त प्रथमच शिवजयंती उत्सव मंडळ व मलबार गोल्ड ॲण्ड डायमंड्स यांच्या माध्यमातून खास महिलांसाठी ” खेळ पैठणीचा” या कार्यक्रमाचे आयोजन २० फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.या बरोबरच १९ फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. या वेळी ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना यावेळी आकर्षक गिफ्ट देण्यात आले. यासाठी ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांचे विशेष सहकार्य लाभले.
उद्घाटन सोहळ्यानंतर अनिल पाटील यांच्या खुमासदार आणि विनोदी सूत्रसंचालनातून या स्पर्धेला सुरुवात झाली. ७२ महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उखाणे, चेंडू फेकणे, लंगडी, दोरीला चिमटे लावणे, बलून फुगवणे, अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. अठरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांचा पैठणी देऊन गौरव करण्यात आला.
स्त्री म्हणजे शक्ती. अपरिमित शक्ती. पण घरच्या दैनंदिन कामातच ही शक्ती व्यस्त राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून याच शक्तीच्या मुक्ततेसाठी, तिला स्वतःचा अवकाश मिळावा यासाठी खास महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा समारंभ आयोजित केला आहे असे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीतावर आधारित विविध खेळांचा आनंद महिलांनी या वेळी लुटला. यातील विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात आली. यात प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या संपदा दयानंद पवार, द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या राजश्री भरत शिंदे, तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या रेश्मा किशोर ढोबळे,चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या ऋतुजा स्वप्निल शिंदे, पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरल्या निलम वैभव शिंदे तर लकी ड्रॉ विजेत्या तेजमाला अविनाश शिंदे, सिंधू अशोक सावंत,विद्या प्रमोद घाडगे ठरल्या.
या बरोबरच सहभागी महिलांना उत्तेजनार्थ २० साड्या व १० पर्स ही बक्षीस देण्यात आल्या .या कार्यक्रमाठी मलबार गोल्ड ॲण्ड डायमंड्स जेव्लरी यांच्या वतीने एक मानाची पैठणी व पाच आकर्षक बक्षिसे,शहा ब्रदर्स ॲण्ड कंपनी इंदापूर यांच्या वतीने २५ साड्या, निसर्ग ब्युटी पार्लर व लेडीज शाॅपी इंदापूर यांच्या वतीने १० लेडीज पर्स बक्षिसे म्हणून देण्यात आल्या होत्या.