दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
उद्यानात देखभाल करणांऱ्या कंत्राटदाराकडून होतेय मजुरांची लूट
मजुरी एका दिवसाची ५२० रुपयें – मजुराला देतात हातात फक्त ३०० रुपयें
चंद्रपूर आम आदमी पार्टी ने आवाज उठविला
चंद्रपूर
शहरातील मनपा अंतर्गत येणाऱ्या उद्यानात देखभाल करणांऱ्या कामगारांना प्रति दिवस ५२० रुपये मजुरी देण्याची तरदूत असताना देखील संबंधित ठेकेदाराकडून मागील काही वर्षांपासून पिळवणूक केल्या जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाच्या नावाखाली माजी नगरसेविकेचा पतीच पडद्यामागून ही भुमिका बजावित असून, मजुरांना केवळ ३०० रुपये रोजी देऊन पिळवणूक केल्या जात आहे. या संदर्भात तातडीने योग्य कारवाई करावी अन्यथा या बाबत आंदोलन उभे करू असा इशारा चंद्रपूर आम आदमी पार्टीने दिला आहे.
शहरातील महानगरपालिकेच्या उद्यानांची देखभाल करणे, पाणी टाकणे, लॉन आणि झाडांकरिता माती, कचरा साफ करणे, निंदण करणे आदी कामासाठी २०२० मध्ये चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाला कंत्राट देण्यात आले. मनुष्यबळाचा पुरवठा करून त्यांच्या कडून काम करवून घेण्याची जबाबदारी या मंडळाकडे आहे. त्यासाठी प्रतिमजूर प्रति दिवस ५२० रुपये मजुरीची तरतूद करण्यात आली आहे. चंद्रपूर स्वच्छता सामाजिक मंडळाचे अप्रत्यक्ष काम बाबुपेठ भागातील माजी नगरसेविकेचे पती बघतात. बहुतेक उद्यानातील कामाचे कंत्राट त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे मजूर देखील हे बाबुपेठ प्रभागातील डॉ. आंबेडकर नगरचे रहिवासी आहेत. मात्र, या कामापोटी ५२० रुपयां ऐवजी केवळ त्यांना ३०० रुपये दिले जात आहे, अश्या आशयाची तक्रार आपचे शहर सचिव राजू शंकरराव कूडे यांच्याकडे प्राप्त झाली आहे. एवढेच नाही तर ठेकेदाराने लागणारे साहित्य सुध्दा कामगारांना स्व: खर्चाने आणायला लावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीएफ खात्यात भरावयाची रक्कम सुध्दा कमी टाकून कामगाराचे शोषण केले जात आहे. आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या पाच दिवसात पीडित कामगाराचे वेतन त्यांच्या खात्यात टाका, अन्यथा संबधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कामगाराच्या हक्क अधिकार अधिनियम अंतर्गत कायदेशिर रित्या कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखिल एका पत्रकार परिषदेत आप कडून देण्यात आला आहे. या वेळेस आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, महिला अध्यक्षा ॲड. सुनिता पाटील ,जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार ,शहर सचिव राजू कुडे, झोन तिन सह संयोजक अजय कुमार बाथव, झोन तिन चे सचिव विनोद रेब्बावार, युवा शहर संयोजक संतोष बोपचे, बाबूपेठ संयोजक अनुप तेलतुंबडे, बाबूपेठ प्रभाग सह संयोजक कृष्णाजी सहारे, महेश ननावरे, वार्ड अध्यक्ष रुपम ताकसांडे, संदीप रायपूरे,यांचे सह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बाबतीत मनपा आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.परंतु गरीब मजुरांच्या मजुरीवर ठेकेदाराने डोळा ठेवून त्यांची पिळवणूक करणे ही बाब निश्चितच बरोबर नाही.या बाबतीत आपने आवाज उठविला ते ही एका अर्थाने बरोबर आहे.