दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नवी दिल्ली : जगाचे पुढारपण मिरवणाऱ्या अमेरिकेने ठरवले तर तो देश रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकणार नाही का? कोणत्याही आशावादी मनाला पडणारा हा प्रश्न. अमेरिका हे युद्ध थांबविण्यासाठी प्रभावी हस्तक्षेप करू शकते.
पण या महासत्तेला तसे ठरवायचेच नाही. त्यामुळेच शस्त्रसंधीसाठी अमेरिका पुढाकार घेण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. उलट रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनला नवनवी शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्रप्रणालींचा पुरवठा अमेरिकेकडून अव्याहत चालू आहे. गेले दहा महिने सुरू असलेल्या युद्धात युक्रेनने या मदतीचा भरपूर वापर केला आणि आणखी मदतीसाठी बुधवारी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्या देशाकडे धाव घेतली. अध्यक्ष बायडेन यांच्याकडून त्यांनी तब्बल दोन अब्ज डॉलरची वाढीव मदत मिळवली आणि भविष्यात ४५अब्ज डॉलरच्या मदतीचे आश्वासनही. अमेरिकेकडून मिळणाऱ्या ‘पेट्रिअट’ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रामुळे युक्रेन रशियन माऱ्याला प्रभावीपणे तोंड देऊ शकेल.