दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
दि . २५/३/२०२३ सेंद्रिय शेतीतील उत्पादने विषमुक्त असल्याने अशा पद्धतीच्या शेतीचे प्रयोग ठिकठिकाणी होत आहेत. पोशरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत आता सेंद्रिय शेतीचे (Organic Farming) धडे गिरवत आहेत. ज्यात शाळेच्या आवारात या विद्यार्थ्यांनी परसबाग फुलवली आहे. शाळेतील या परसबागेतून उगवलेल्या भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनात उपयोग होत आहे. दरम्यान ही परसबाग सांडपाण्याचा वापर करत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देऊन फुलवली आहे.
मध्यान्ह भोजनात ISO जिल्हा परिषद केंद्रशाळा पोशेरा शाळेच्या शाळेतील परसबागेतून विद्यार्थ्यांना भाजी लागवड, जैविक खत, बियाणे, औषधी, शेती मशागत, सेंद्रिय शेतीची माहिती दिली जात आहे. पालघर जिल्ह्यातील या पोशेरा येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शाळेतून अभ्यासक्रमाबरोबर शेतीविषयक पायाभूत माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी आवारात परसबाग फुलवली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून सेंद्रिय शेतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळू लागले आहे. या परसबागेतील सेंद्रिय भाज्यांचा वापर माध्यान्ह भोजनात होत आहे. शाळेतील कमी जागेचा वापर करुन ही बाग फुलवली असून उत्पादन आणि ज्ञान असे दोन्ही उद्देश सफल करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा प्रयोग
विद्यार्थ्यांना सकस, ताज्या भाज्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात, भाज्या लागवडीविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने ISO केंद्रशाळा पोशेरा शाळेच्या आवारातच शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी हा प्रयोग केला आहे. टोमॅटो, वांगी, पालक, मोहरी,मेथीची लागवड करुन परसबाग तयार केली आहे. ज्यात हंगामानुसार शाळेच्या आवारात भाजीपाला लागवड केली जात असून विद्यार्थ्यांनी पिकवलेल्या भाज्या शालेय पोषण आहारामध्ये वापरल्या जात आहेत.
ISO केंद्रशाळेच्या पोशेरा शाळेतील श्री. निखडे सर व श्री.पावरा सर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम चालू आहे.