
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
पुणे : रायगड तालुक्यातील लिंगाणा किल्यावर अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी नेहमी जात असतात मात्र नुकतेच लिंगाण्यावर आलेल्या पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुपमधील एका जेष्ठ पर्यटकाचा ह्रदयविकाराचा झटका येऊन जागीच मृत्यू झाला. अजय काळे वय -६२ असे या पर्यटकाचे नाव असून ही दुख:द घटना सोमवार दि.२७ रोजी सकाळी घडली. सोबत असलेल्या ट्रेकर्सनी दिलेल्या माहितीनुसार लिंगाणा किल्ला हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत येत असला तरी किल्ल्याकडे जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातून सिंगापूरमार्गे रस्ता आहे. ट्रेक सुरु असतानाच काळे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या हातात असलेले स्मार्ट वॉच त्यांचे बिघडलेले ह्रदयाचे ठोके व रक्तदाब दाखवत होते परंतु अशा वेळी सोबत असलेल्या प्राथमिक मेडिकल किटने उपचार करणे अशक्य होते त्यातच दुर्गम भाग असल्याने कोणतीच वैद्यकीय साधने उपलब्ध नसल्याने काळे यांचा जागीच मृत्यू झाला.
वेल्हे तालुक्यातून सिंगापूरमार्गे असलेल्या मार्गातून जाणे अत्यंत अवगड असून दुर्गम व डोंगरी भाग असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित रेस्क्यू टीमची गरज होती. मयत काळे यांच्या सोबत असलेल्या ट्रेकर्सनी यावेळी पुन्हा मोहरी या गावाजवळ येऊन पुण्यातील एस.एल.ऍडव्हेंचर टीमला संपर्क करून मदत मागवली.त्यानुसार सोमवारी दुपारी ४ वाजता एस.एल.ऍडव्हेंचर टिमचे सदस्य तुषार दिघे, कृष्णा मरगळे, रोहित अंदोडगी हे आवश्यक त्या उपकरणांनसह मोहरी गावाजवळ पोहचले . खडतर रस्ता, रात्रीचा अंधार यामुळे इतर वेळी साधे चालणेही अत्यंत अवघड असलेल्या डोंगर दऱ्याच्या वाटेवरून रोपव्दारे बनवलेल्या स्ट्रेचरवरून मृतदेह आणणे हे जिकीरीचे होते. त्यानंतर जवळजवळ ११ तास रेस्क्यू मोहीम राबवून पहाटे ३ वाजता मृतदेह मोहरी गावात आणण्यात या टिमला यश आले.स्थानिक माहिती देण्यासाठी तानाजी भोसले, गणेश संपकाळ, अंकुश तुपे आदी स्थानिक नागरिकांची मदत झाली .
एस.एल ऍडव्हेंचरचे प्रमुख लहू उघडे याविषयी बोलताना म्हणाले की, उन्हाळ्यात दुर्गम ठिकाणी ट्रेकिंगला जाताना आपल्या शरीराची क्षमता ओळखून साहस केले पाहिजे. सोबत पुरेसे पाणी, सुकामेवा हे घेणे गरजेचे आहे. तसेच अशा मोहिमा या प्रशिक्षित गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखाली कराव्यात. दुर्गम ठिकाणी कसलेही नेटवर्क नसल्याने काही अघटित घडल्यास संपर्क साधने अवघड होते. त्यामुळे पायवाटा माहिती असलेल्या ग्रुपसोबतच ट्रेकिंगला जावे. कालच्या प्रकरणातही नेटवर्क नसल्याने त्यांना संपर्क करणे अवघड झाले होते.