दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली – ‘राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवताहेत‘ असं म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी राहुल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘त्यामुळे ते असेपर्यंत आम्हाला काहीही करण्याची गरज नाही‘ असं मत चौहान यांनी व्यक्त केलं. तसेच ‘पंजाबमध्ये चांगले अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नादात पंजाबमधील सरकार संपवलं‘ असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. चौहान यांच्या या विधानाचा एक व्हिडीओ देखील ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली.आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी राजीनामा दिला आहे. सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आतासारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. याच दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘सध्या राहुल गांधी स्वतः काँग्रेसला बुडवण्याचं काम करत आहेत. पंजाबमध्ये स्थापन झालेलं सरकार त्यांनी संपवलं. अमरिंदर सिंग चांगले मुख्यमंत्री होते. नवज्योत सिंग सिद्धूच्या नादात अमरिंदर सिंग यांना हटवलं आणि आता सिद्धू पण पळाले. त्यामुळे आता राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरजच नाही‘ असं चौहान यांनी म्हटलं आहे.