दैनिक चालु वार्ता श्रीक्षेत्र माहूर प्रतिनीधी –
माहूर येथील जि.प.च्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या विषय शिक्षिका अर्चना मेहेरे यांना उमरखेड येथील श्रीराम मंगल कार्यालयात दि.6 जून रोजी संपन्न झालेल्या अग्निपंख शैक्षणिक समूह राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आईसर कोलकाता त्रिवेंद्रमचे गव्हर्नर डॉ. ए.ए.नातू हे होते, तर यवतमाळ जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते उदघाट्न झाले.अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. योगेश नेर, जि. प. चे शिक्षणाधिकारी ( प्रा.)प्रमोद सूर्यवंशी, गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी हेमचंद रामटेके, महिला राज्य समन्वयक मिरा गोपेवाड,डॉ.ममता मालवीय,राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे माजी संचालक रविंद्र रमतकर, गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड व गजानन गोपेवाड यांची प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती.
गणित/विज्ञान विषयाची आवड असलेल्या अर्चना मेहरे यांनी शाळेत विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. त्या शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे,विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, संचयी बचत बँकेचे महत्व पटवून बचत करण्याची सवय लावणे, विज्ञान कोडे सोडवून घेणे,विज्ञानाचा वार म्हणून गुरूवार हा दिवस साजरा करणे, घर घर शास्त्रज्ञ, हर घर शास्त्रज्ञ व चला शिकूया हे ब्रिद प्रयोगातून पटवून देणे, सांस्कृतीक कार्यक्रम घेणे,वृक्षारोपण करणे,जलसंधारणाचे महत्व पटवून देणे,सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम राबविणे,तंत्रस्नेही शिक्षिका, थोर पुरष, शास्त्रज्ञ, विविध स्पर्धा गाजवून देशाचा सन्मान वाढविणारे खेळाडू यांची जयंती, पुण्यतिथ साजरी करणे,कला आणि कार्यानुभवाची सविस्तर माहिती करून देणे आदी कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.गटशिक्षणाधिकारी रविंद्र जाधव, विस्तार अधिकारी संतोष शेटकर,केंद्रप्रमुख एस.आर.चव्हाण, मुख्याध्यापिका एम.एस.मानकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंजाब शिंदे,सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.