दैनिक चालु वार्ता श्रीक्षेत्र माहूर प्रतिनीधी –
आजपासून माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरु झाल्या आहेत. माहूर शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्याधपिका पाटील मॅडम व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी गुलाबाचे फुलं व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपस्थित विद्यार्थ्यांना आजच पुस्तकाचे वाटप करण्यात आले. निधी प्राप्त झाला नसल्याने शाळेचा गणवेश मात्र देण्यात आला नाही.यावर्षी माहूर तालुक्यात पावसाळा लांबल्याने कडाक्याचे उन तापत आहे.त्यामुळे उष्णतेने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.ही बाब लक्षात घेऊन काही दिवसानंतर शाळा उघडावी अशी पालकांतून मागणी होत आहे.
माहूर येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाचे 1 ते 7 व उर्दू माध्यमाचे 1 ते 4 असे वर्ग आहेत.आज पासून विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देणे सुरु आहे.या शाळेत सद्यस्थितीत 184 विद्यार्थी मराठी माध्यमातून व 140 विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेत आहेत. येथे शिक्षकांची मान्यपदे 15 असून 12 शिक्षक कार्यरत आहेत. मुख्याध्यापकासह 1 पदवीधर व 1उर्दू शिक्षकाची जागा रिक्त आहे.काउन्सलिंग झाली नसल्याने मुख्याध्यापक मात्र शाळेवर रुजू झाले नाहीत. या शाळेला दोन वर्षांपासून अनुदान न मिळाल्याने लागणाऱ्या साहित्याच्या खर्चासह 14 हजार रुपये एवढ्या विद्युत बिलाचा भरणा स्वतः मुख्याध्यापकांना करावा लागला आहे. काही वर्गातील पंखे नादुरुस्त तर काही वर्गात पंखेच नाहीत,पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नाही.अशा अनेक असुविधा पहिल्याच दिवशी आढळून आल्याने शिक्षण विभागाने उचित उपाय योजना कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.