अभ्यासाने, ज्ञानाने गुणवंत व्हा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भविष्याचा पाया पक्का करा…
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
उस्मानाबाद/ परंडा – आज परंडा तालुक्यातीलजिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला या शाळेमध्ये शालेय परिपाठानंतर अचानकपणे परंडा गट शिक्षण कार्यालयातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संभाजी खैरे यांनी शाळेला भेट दिली. आणि शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या शिक्षणाचा पाया जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच पक्का करावा,ह्याच ज्ञानाच्या शिदोरी वरती भविष्यातील यशाच्या शिखराकडे जाण्याचा मार्ग सुकर करावा असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गुरुजनांप्रती, आई वडिलांप्रति कृतज्ञता ठेवावी हा लाख मोलाचा संदेश खैरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला या शाळेचा शिक्षक स्टाफ शाळेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सुंदर लाभलेला असून,शाळेच्या सर्व भौतिक सुविधा, शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, हरित शाळा पाहून खैरे यांनी समाधान व्यक्त केले. खऱ्या अर्थाने शिक्षणातून आपण प्रगती कशी केली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख खैरे यांचे शाळेच्या वतीने स्वागत मुख्याध्यापक श्री धनाजी खरात, सहशिक्षक श्री प्रकाश लोकरे, श्री वैभव पिंगळे, श्रीम.मनीषा कोकाटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शाहीर श्री शरद नवले यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन आज ऐकायला मिळाले विद्यार्थी शिक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून आला.