
धर्माची शाल पांघरून
मतांचा जोगवा मागणाऱ्या
भडव्यांच्या बाजारात
लोकशाही नागडी झालीय चौकात
बेरोजगारांच्या स्वप्नांवर
बलात्कार होतायत
आणि राजकारणात मात्र
चमत्कार घडतायत
वशिल्याचा बाप हुडकत
फायली दारात उभ्या होतात
आणि आश्वासनाचा मुका घेऊन
माघारी फिरतायत
तरीही विकास काही फळत नाही
पदर ढळत नाही म्हणून काय झालं..?
पण आमचाच विनयभंग होतोय
हेच आम्हाला कळत नाही
फोर जी च्या नेटवर्क मध्ये
पांगळे झालेले तरुण
विनोदी व्हिडीओ बनवत बसलेत
जिंदगीला घोडा लागला तरी
हे म्हणतयं साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत…
काल तिरडीवर बाप गेला
आज आईला ठेवलं तरीही
गाबडी अंगठा फिरवत बिझी आहेत फोनवर
त्याच स्क्रिनवर शिवराय दिसले की
याचं रक्त सळसळून येतं
पण तेवढ्याच पुरतं..
अजूनही वेळ गेली नाही
उठा या देशातील हाडांचे सापळे
मुकी जनावरं
पाखरं
इथं झालेल्या आत्महत्या
आणि देशासाठी शहीद झालेते जवान
हे सगळे वाट पाहतायत आपली
कारण तिरंग्याची लाज आता
आपल्यालाच वाचवायची आहे…
दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली
7020909521