
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
” महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात”
महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत चंदनाप्रमाणे त्यांनी आपला देह झिजवला स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर गावोगावी फिरवून कीर्तन करून अज्ञानरूपी समाजाला प्रकाश दिला.भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी रचला.
संत नामदेव महाराजांनी देशाला माणुसकी,शांतता, राष्ट्रीय एकात्मता, खरी भक्ती, यांचा संदेश दिला. मनुष्याचे मने जोडण्याचे काम त्यांनी अभंगातून केले आहे. प्रत्यक्ष विठ्ठललाही आपल्या अभंगातून बोलायला व डोलायला लावणाऱ्या संत नामदेवाची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने हा लेखन प्रपंच………
नामदेव महाराज यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नरसी ब्राह्मणी या गावी इसवी सन २६ सप्टेंबर १२७०
मध्ये वडिल दामा शेठ व आई गोणाई यांच्या पोटी झाला.लहानपणीच देवाला नैवेद्य खाऊ घालण्यासाठी ते गेले आणि नैवेद्य खाऊ घालूनच घरी परत आले. असे आपण नेहमी ऐकतो.त्यांचा पिढीजात व्यवसाय शिलाई करणे असल्यामुळे ते नेहमी कपडे शिलाई करत होते .आपला उदरनिर्वाह चालवत होते .संत नामदेवाचे घर पंढरपूरला मंदिराच्या शेजारी असल्यामुळे त्या मंदिरात सकाळ- संध्याकाळ जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेत होते, याच काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान ,आणि संत मुक्ताबाई ही बहिण- भावंडे समकालीन होती .संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत विठोबा,संत योगीराज चांगदेव ,संत जनाबाई ,संत बंका, संत चोखामेळा ,संत परिसा भागवत ,संत कबीर, संत नरहरी सोनार, संत भानुदास, संत कान्होजी पाठक या सर्वांनी एकमेकांच्या भेटी घेतलेल्या आहेत,वरील सर्व जण वारकरी संप्रदायांमध्ये होते,भक्ती करताना काही नियम पाळावे लागतात ते संत नामदेवांनी एक वेळेस पाळले नाहीत, तेव्हा संत मुक्ताईने
अखंड जयाला देवाचा शेजार।
कारे अहंकार नाही गेला।।
या अभंगातून त्यांची कान उघडणी केली,संत नामदेव विठ्ठल भक्तीत एवढे तल्लीन झाले असले तरीही त्यांनी संसारात लक्ष दिले, संत नामदेवाच्या चरित्रामध्ये त्यांनी पांडुरंगाला आपल्या अभंगातून सांगितलेले आहे .
जिथे जातो तेथे तू माझा सांगाती। चालविशी हाती धरोनिया।।
या संत नामदेवांनी विठ्ठलाला तू जिथे आहेस तेथे मी तुझ्या सोबत आहे.
तुझा हात धरून मी चालणार आहे ,असे सांगितले आहे.
आज सुद्धा पंजाब मधील शीख समाजातील अनेक व्यक्ती संत नामदेव महाराजांना वारकरी परंपरेतील सर्व श्रेष्ठ संत समजतात.
पंजाबमधून दरवर्षी आषाढी- कार्तिकी एकादशीला पंढरीला येतात ,त्यांचे दर्शन घेऊन तृप्त होतात ,आम्ही नामदेवाचे भक्त आहोत असे सांगतात ,काही लोकांनी संत नामदेवाकडून अनुग्रह घेतलेला आहे, असेही आपण वाचतो ,पंजाबमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे संत नामदेवाला जाणारी भक्तगण शुद्ध शाकाहारी आहेत, संत नामदेवाच्या गाथेची सुद्धा शेकडो लोक आजही मनोभावे वाचन व पूजन करताना दिसतात,संत नामदेवाच्या भक्तीचे वैशिष्ट्ये म्हणजे शीख संप्रदायातील लोकांना विठ्ठलभक्तीकडे वळविले आहे,चांगल्या व्यक्तीला समाजामधून नेहमी विरोध झालेला आहे, संत नामदेवांना सुद्धा थोडासा त्रास द्यावा म्हणून बरीदशाहाने स्वतः गाय मारली आणि संत नामदेवाचे कीर्तन ज्या ठिकाणी चालू होते, त्यांच्या बाजूला आणून टाकले, संत नामदेव महाराज कीर्तनात दंग झाले होते, पांडुरंगाला जर प्रेमाने हाक मारली तर मेलेला प्राणी सुद्धा जिवंत होईल असे ते म्हणाले,तेव्हा बरीदशहा पुढे आला आणि म्हणाला “या गाईला जिवंत करा” तेव्हा संत नामदेवाने पांडुरंगाच्या धावा केल्या आणि म्हणाले “ही गाय जिवंत करा” खरोखरच काही वेळानंतर गाय जिवंत झाली असेही सांगितले जाते ,
संत नामदेवाच्या संपूर्ण जीवनकार्याच्या मुळाशी त्यांचे व्यक्तीशी संवाद साधने,जगी ज्ञानदीप लावणे ,हीच प्रमुख प्रेरणा होती.
भारत भ्रमण करून त्यांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले, शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेब या धर्मग्रंथात ६१ओव्या संत नामदेवाच्या आहेत. संत नामदेवामुळे पुढच्या काळात पंजाब मधील संतापुढे देव असे विशेषण लावण्यात येऊ लागले.
आज भारतात सर्वत्र त्यांची मंदिरे दिसून येतात. संत नामदेवाचे मोठेपण यात आहे की त्यांच्या कार्याचा प्रभाव अनेक संतांच्या रचनावर दिसून येतो. महाराष्ट्रात अशी एक महान कीर्तनकार होऊन गेलेले आहेत ,की ज्यांची पत्नी संत होती, त्यांचे आई-वडील सत्पुरुष होते, मुले- मुली संत होत्या, बहीण भाऊ , कन्या लिंबाई, सून लाडाई हे सर्वजण संत होते. सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले केवळ महाराष्ट्र नाही तर जगाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे उदाहरण म्हणून सांगता येईल.
संत नामदेवाची गाथा प्रसिद्ध आहे त्यांनी साडेचार हजार अभंग लिहिले आहेत. संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगांमध्ये दाभिकपणा, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांना स्थान दिले नाही, त्यांना खतपाणी घातले नाही, संत नामदेवाचे अभंगामुळे अनेकांचे जीवन बदलले, संत नामदेवाच्या सहवासामध्ये चोर सुद्धा सज्जन झाले, मानवामध्ये प्रामाणिकपणा असावा,असे ते नेहमी सांगत असत. संत नामदेव आणि संत जनाबाई याविषयी आपणाला माहिती आहे जनी ही शूद्र असूनही तिचा संत नामदेवाने उद्धार केला. संत नामदेवाच्या सहवासामुळे जनाबाईचे जीवनकार्य सफल झाले.
ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीची आई ।।
भीमा आणि चंद्रभागा। तुझ्या चरणीची गंगा।। अशाप्रकारे अभंग रचून जनीने पंढरीचे महात्मे सांगितले आहे.
अशा या महान संताने महाराष्ट्रामध्ये मानवी जातीच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी आजीवन कार्य केले, पंढरपूरला लोक दर्शनाला येतात तेथे पहिली जी पायरी आहे त्या पायरीला नामदेव पायरी म्हणून ओळखले जाते. कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे कार्य खरोखरच कोणी केले असेल तर संत नामदेवांनी केले आहे ,हे सांगण्याची गरज राहिली नाही,
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा।।अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझ्या विष्णूदासी भाविकाशी ।।
नामा म्हणे तया असावे कल्याण। ज्यामुखी विधान पांडुरंग ।।
आज खरोखरच समाजाला संत नामदेव महाराजांच्या विचारांची गरज आहे. चांगल्याच्या संगतीत सहवास लाभला की आपले आयुष्य चांगले होते ,जातीला महत्व न देता त्यांच्या कर्तुत्वाला महत्त्व द्यावे. ज्ञानाच्या क्षेत्रात ते कुठेही कमी पडले नाहीत, शेवटपर्यंत त्यांनी आपला विनम्रपणा सोडला नाही, कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली भक्ती मार्गाची पताका त्यांनी द्वारका, मारवाड ,मथुरा, हरिद्वार या ठिकाणी फडकावली, पंजाबमध्ये मरड आणि भट्टीवाल या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले, संत नामदेव महाराजांची लाहोर ,अमृतसर, गुरुदासपूर ,लुधियाना ,जालंदर, लायलपूर ,अंबाला ,भिवानी, राजपुताना ,बिकानेर जोधपुर, भरतपूर अलवार या ठिकाणी मंदिरे आहेत. शेवटच्या काळात घुमान येथे ते वीस वर्षे राहिले आणि तिथेच ३ जुलै १३५० ला पंढरपूर येथेच ब्रह्मलीन झाले.
संत नामदेवाच्या कार्याने संपूर्ण भारत एक संघ झाला .संत नामदेवांनी केलेले कार्य खरोखरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे होते.
“संत नामदेवाची अभंगवाणी अमृताची खाण आहे “अस्पृश्यउधारक संत म्हणून त्यांचा गौरव होतो .अलीकडेच २०१५ मध्ये पंजाब मधील घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरून नामदेवांची विचारधारा आजही माणसा माणसातील भेदभाव नाहीसा करीत आहे. भागवत धर्माच्या ध्वजाखाली सर्वांना एकत्रित आणून राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य झालेले आहे. म्हणूनच संत नामदेव हे आद्य कीर्तन कार होते.त्यांच्या कीर्तनातून समाज सुधारला आहे.
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड